दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात

Entertainment : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सूर्या (Surya) त्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. चाहतेही त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सूर्याचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाची शूटिंग चेन्नईमध्ये सुरू होती. त्यादरम्यान एका सीनचे शूटिंग करताना सूर्यावर कॅमेरा पडला. यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी चेन्नईमध्ये भव्य सेट उभारण्यात आला होता. सूर्याला दुखापत झाल्यानंतर चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. सुर्याला किती गंभीर दुखापत झाली, याबद्दलची अद्याप माहितीसमोर आली नाही. परंतु सूर्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येताच चाहते त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहे.
दरम्यान, सूर्या हा तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. देशभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. वाढदिवसानिमित्त सूर्याने त्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने सूर्या आणि दिग्दर्शक शिवा पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक शिवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सूर्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. तब्बल 38 भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. मात्र या चित्रपटातील सूर्याच्या फर्स्ट लुकनेच प्रेक्षकांची मन जिंकली होती.





