जोहान्सबर्ग : जवळपास 3 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिका फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स या आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडली आहे. मनी लॉन्डरिंग आणि दहशतवादाच्या अर्थसहाय्याबाबत केलेल्या उपाययोजनांमुळे दक्षिण आप्रिकेला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात आले आहे, असे गेल्या आठवड्यात पॅरिस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत एफएटीएफने जाहीर केले. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये असलेल्या देशांच्या आर्थिक व्यवहारांवर जरा जास्तच देखरेख केली जात असते. मनी लॉन्डरिंग आणि दहशतवादाच्या अर्थसहाय्याला रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती या देशांनी सातत्याने देणे अभिप्रेत असते. या उपाययोजना कराव्यात असे उद्दिष्ट एफएटीएफने दक्षिण आफ्रिकेला दिले होते. दक्षिण आफ्रिकेने ३२ महिन्यांपासून या उपाययोजनांची अंमलबजावणी केली आणि मनी लॉन्डरिंग, दहशतवादवादाच्या अर्थसहाय्याविरोधात उपाययोजाना केल्या, असे दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे. नायजेरिया, मोझांबिक आणि बुर्किना फासो या आफ्रिकेतील अन्य देशांनाही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून वगळण्यात आले आहे.