Nagar | साखर कामगारांसाठी लवकरच त्रिपक्षीय समिती : शरदराव नेहे

नगर, (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कामगारांसाठी लवकरच त्रिपक्षीय समिती स्थापन करू, असे आश्वासन दिल्याची माहिती साखर महासंघाचे उपाध्यक्ष शरदराव नेहे यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीने साखर कामगार त्रिपक्षीय समिती लवकरात लवकर स्थापन, व्हावी या करिता अगस्ती सहकारी साखर कारखाना या स्थळावर महासंघाचे उपाध्यक्ष शरदराव नेहे, कोषाध्यक्ष शिवाजीराव कोठवळ, उपाध्यक्ष विलास वैद्य,
रावसाहेब वाकचौरे, विजय देशमुख, संदीप मालुंजकर, प्रभाकर जाधव यांनी निवेदन दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर त्रिपक्षीय समिती गठित करू असा शब्द दिला आहे.
राज्यातील साखर कारखान्यातील कामगारांचे वेतन वाढीसाठी दर तीन वर्षांनी वर्षांनी त्रिपक्षीय समितीची स्थापना केली जाते.
सदर समितीमध्ये कारखाना मालक प्रतिनिधी तसेच सहकार खात्याचे प्रतिनिधी साखर आयुक्त व राज्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ असे राज्यव्यापी कामगारांचे वेतन वाढीसाठी समिती नेमली जाते.
ती समिती साखर कामगारांच्या वेतन वाढीचा निर्णय करते. मागील त्रिपक्ष समितीची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली असून नवी त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने करण्यात आली.





