Sonu Sood | Khushi Kapoor | Ibrahim Ali Khan : अभिनेत्री खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान सारख्या नवीन कलाकारांबद्दल सोशल मीडिया सध्या चांगलीच चर्चा होताना दिसून येते नेटकरी त्यांच्या कामावर जोरदार टीका करत आहेत आणि त्यांना कमकुवत देखील म्हणत आहेत. अश्यातच आता यावर अभिनेता सोनू सूदने आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना चित्रपटसृष्टीत येणाऱ्या नवीन कलाकारांशी विनम्रतेने वागण्याचे आवाहन अभिनेत्याने केले आहे. कोणत्याही चित्रपटाचे किंवा शोचे यश किंवा अपयश ही संपूर्ण टीमची जबाबदारी असते, असे अभिनेत्याने सांगितले. ‘कृपया चित्रपट उद्योगात आणि इतरत्र नवीन कलाकारांशी विनम्रतेने वागा. जेव्हा कोणताही माणूस काम सुरू करतो तेव्हा तो परिपूर्ण नसतो. आपण सर्वजण आयुष्यात अनुभवाने शिकतो. फक्त काही मोजक्या लोकांनाच दुसरी संधी मिळते’. असं सोनू सूद म्हणाला आहे. यश असो वा अपयश, जबाबदारी एका किंवा दोन लोकांवर नाही तर कोणत्याही क्षेत्रातील संपूर्ण टीमवर असते, असे या अभिनेत्याचे मत आहे. ही प्रत्येक सहभागी सदस्याची जबाबदारी आहे. आपण सर्वजण शिकणारे आहोत. असं देखील तो यावेळी म्हणाला आहे. दरम्यान, यापूर्वी अभिनेता अलीकडील वृत्तांवर प्रतिक्रिया देताना दिसला होता की त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. यावर देखील तो स्पष्ट बोलला आहे. सोनूने इंस्टाग्रामवर लिहिले की, आपल्याला हे स्पष्ट करावे लागेल की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या बातम्या अत्यंत खळबळजनक आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या तिसऱ्या पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही, त्याच्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने आम्हाला साक्षीदार म्हणून बोलावले होते. लुधियानाच्या एका न्यायालयाने सोनू सूदविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केल्याची बातमी होती. लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले. ५१ वर्षीय अभिनेत्याला या प्रकरणात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते परंतु तो न्यायालयीन कामकाजात उपस्थित राहू शकला नाही. यानंतर, दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले.