बालवयातच करतोय ज्वालामुखीचा अभ्यास
पुणे – नऱ्हे येथील पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारा सोनित सिसोलेकर हा आठवीत शिकत असून, तो ज्वालामुखीचा अभ्यासक आहे. भूशास्त्रज्ञ होण्यासाठी तो तयारी करत असून, लुनार अँड प्लॅनेटरी सायन्स या नासाच्या परिषदेतही तो सहभागी होणार आहे. सोनितला पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी सोनितने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर केला जातो.
यंदा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्यातील पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूल मधील सोनित सिसोलेकरची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. देशात एकूण 32 बालशौर्य मुलांची पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील
प्रा. रेमंड दुराईस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनित ज्वालामुखीसंदर्भातील अभ्यास करत आहे. ज्वालामुखीच्या अभ्यासाच्या आवडीबाबत सोनित म्हणाला, “वडीलांबरोबर टेकडीवर फिरायला गेल्यावर ते दगड दाखवायचे, दगडांच्या निर्मितीविषयी सांगायचे. त्यामुळे ज्वालामुखीबाबत उत्सुकता निर्माण झाली.
त्या उत्सुकतेतून वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांचे संकलनही केले. पुढे जाऊन मला भूशास्त्रज्ञच व्हायचे आहे. ग्रामीण भागात भूशास्त्र आणि खगोलशास्त्र याविषयी जागृती निर्माण करायची आहे. भूशास्त्रज्ञ होण्यासाठीची तयारी करत आहे.’ दरम्यान, सोनितचे वडील संतोष क्लिनिकल रीसर्चर आहेत, तर आई दंतवैद्यक आहे.
दरम्यान, “आपण केलेले संशोधन ही केवळ सुरुवात असून संशोधन क्षेत्रात देशाचे नाव मोठे करावे,’ असे प्रोत्साहन नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेतून मिळाले, असेही सोनितने सांगितले.