सोनम वांगचुक यांची दिल्ली चलो पदयात्रा सुरू

लेह : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी रविवारपासून दिल्ली चलो पदयात्रा सुरू केली. केंद्र सरकारने चारकलमी अजेंड्यावर लडाखच्या नेतृत्वाशी थांबलेली चर्चाप्रक्रिया पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी ती पदयात्रा काढण्यात आली आहे. लेह ॲपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स या संघटना मागील चार वर्षांपासून चारकलमी अजेंड्यासाठी आंदोलन करत आहे.
लडाखला राज्याचा दर्जा, राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टाचा विस्तार, तातडीने भरतीप्रक्रिया, लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी लोकसभेच्या स्वतंत्र जागा या मागण्यांशी संबंधित तो अजेंडा आहे. त्यावरील केंद्र सरकार आणि लडाखच्या प्रतिनिधींमधील चर्चा मार्चमध्ये कुठल्या ठोस निष्पत्तीशिवाय ठप्प झाली.
आता चर्चाप्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे कूच करण्यात आले आहे. त्या पदयात्रेत १०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबरला दिल्लीत पोहचण्याचा संकल्प पदयात्रेत सहभागी झालेल्यांनी केला आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर गुड न्यूज देऊन सरकार स्वागत करेल, असा विश्वास वांगचुक यांनी व्यक्त केला.





