Ladakh: लद्दाखमध्ये संपूर्ण बंद; हजारो नागरिक रस्त्यावर, राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठी आंदोलन
Ladakh: "लद्दाखच्या लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्याकडे आंदोलन सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही." लद्दाखचे खासदार मोहम्मद हनीफा जान हेही सोमवारी कारगिलमधील रॅलीत सहभागी झाले.

Ladakh: केंद्र सरकारशी सुरू असलेल्या चर्चेत गतिरोध निर्माण झाल्याने सोमवारी लद्दाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बंद पाळण्यात आला. लेह एपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायंस (KDA) या दोन संघटनांच्या आवाहनावर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. लेह आणि कारगिलमधील बाजारपेठा बंद राहिल्या. झान्स्करसारख्या दुर्गम भागांतील नागरिकही या बंदमध्ये सहभागी झाले. गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी पोलीस गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे पहिले मोठे आंदोलन आहे.
चार सूत्री मागण्या –
आंदोलक नागरिक चार प्रमुख मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. लद्दाखला राज्याचा दर्जा बहाल करणे, संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण देणे, लद्दाखच्या तरुणांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि लेह व कारगिलसाठी स्वतंत्र संसदीय मतदारसंघ स्थापन करणे, अशा या मागण्या आहेत. नागरिक बॅनर घेऊन बाजारांमध्ये आंदोलन करत होते.
लोकतांत्रिक प्रतिनिधित्वाचा अभाव –
लद्दाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले तेव्हापासून तेथे कोणतीही विधिमंडळ नाही. त्यामुळे एक खासदार वगळता नागरिकांचे पुरेसे लोकशाही प्रतिनिधित्व नाही. लेहच्या स्वायत्त पर्वतीय परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ १ नोव्हेंबर २०२५ रोजी संपला असून नव्या निवडणुकांची घोषणाही झालेली नाही.
#WATCH | Kargil, Ladakh: Leh Apex Body and Kargil Democratic Alliance organised a protest today regarding their four-point agenda, including restoration of statehood, inclusion under the Sixth Schedule, jobs and cultural security pic.twitter.com/fZcYlqk8NP
— ANI (@ANI) March 16, 2026
नेत्यांचे म्हणणे काय?
एचपीसी सदस्य आणि एलएबीचे सह-अध्यक्ष चेरिंग दोरजय लकरूक यांनी सांगितले की आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण राहिले. “पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड उभारले होते, तरीही आम्ही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. या आंदोलनाचा उद्देश नवी दिल्लीला हे सांगणे आहे की आम्ही आमच्या हक्कांची मागणी करणे सोडणार नाही,” असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘शिवालिक’ एलपीजी टँकर मुंद्रा बंदरात दाखल; ‘नंदादेवी’ भारताच्या दिशेने मार्गस्थ
लकरूक यांनी गृह मंत्रालयावर संवाद बाधित केल्याचा आरोप करत म्हटले, “केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय आमच्याशी कोणतीही चर्चा न करता थोपवला गेला. त्यामुळे सध्याची अशांतता ही केंद्राच्याच धोरणांचा थेट परिणाम आहे.” केडीए सदस्य सज्जाद कारगिली म्हणाले, “लद्दाखच्या लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्याकडे आंदोलन सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही.” लद्दाखचे खासदार मोहम्मद हनीफा जान हेही सोमवारी कारगिलमधील रॅलीत सहभागी झाले.
सोनम वांगचुक तुरुंगातून मुक्त –
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पोलीस गोळीबाराच्या घटनेच्या वेळी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) अटक करण्यात आली होती. केंद्र सरकारने त्यांच्यावरील केस मागे घेतल्यानंतर शनिवारी त्यांची जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत महिन्यांनंतर झालेल्या पहिल्या मोकळ्या भेटीची भावना व्यक्त केली.





