Sonam Wangchuk : ‘मी नजरकैदेत आहे’; सोनम वांगचुकांचा खळबळजनक दावा, अभिजीत दीपकेंनी सरकारला सुनावलं
Sonam Wangchuk :

Sonam Wangchuk : पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लडाखमधील आपल्या घरात नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. घराबाहेर डझनभर सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
या प्रकरणावर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2029 पूर्वी सरकार प्रत्येकाला नजरकैदेत, ताब्यात किंवा अटकेत ठेवेल आणि सोशल मीडियाच्या वापरावरही निर्बंध आणेल, असे दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
अभिजीत दीपके यांनी गुरुवारी ‘एक्स’वर वांगचुक यांचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला. तसेच, जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान कथित हुकूमशाहीविरोधात देशाला जागृत करण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले.
सोनम वांगचुक यांचा सरकारवर सवाल Sonam Wangchuk :
वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून डझनभर सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराला वेढा घातला आहे. मात्र, सरकारकडून त्यांना केवळ घरीच राहण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे आपल्यासोबत असे केले जात असल्याचे वांगचुक यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी लेहमध्ये झालेल्या हिंसाचार आणि हत्याकांडाच्या न्यायिक चौकशी आयोगाचा अहवाल अद्याप का प्रसिद्ध झालेला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कडाक्याच्या थंडीत घाईघाईने नगर परिषद निवडणुका का घेतल्या जात आहेत, असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.
सोशल मीडियावरील पोहोच कमी केल्याचा आरोप Sonam Wangchuk :
संपूर्ण लडाख आंदोलन करत असताना सोशल मीडियावर आपली पोहोच मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याचा आरोपही वांगचुक यांनी केला. एक्स, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील आपली पोहोच मर्यादित झाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. आपला संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.






