Sakshi Malik : साक्षीवर मात करत सोनमला सुवर्ण

आग्रा – हरियाणाच्या सोनम मलिक हिने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक हिच्यावर पुन्हा एकदा मात देत राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविले.
उत्तर प्रदेशात आग्रा येथे आजपासून सुरू झालेल्या महिलांच्या 23 व्या राष्ट्रीय स्पर्धेत 62 किलो वजनी गटात सोनम मलिक हिने लहान वयातही आपली प्रगल्भता सिद्ध केली. वयाने आणि अनुभवाने लहान असूनही सोनमने आज साक्षीवर मात केली. यापूर्वी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीतही सोनमने साक्षीवर मात केली होती. त्याचीच आज तिने पुनरावृत्ती केली. साक्षीला रजतपदकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील 57 किलो वजनी गटातही हरियाणाच्या अन्शु मलिक हिने अपेक्षित सोनेरी कामगिरी केली. सब ज्युनियर, ज्युनियर गटापासून पदकांचा सपाटा लावणाऱ्या अन्शुने वरिष्ठ गटातही आपली मोहोर उमटवली आहे. करोनाच्या संकटकाळानंतर जागितक अजिंक्यपद स्पर्धा रद्द करून आयोजित केलेल्या वैयक्तिक विश्वकरंडक स्पर्धेत तीन पदकाची कमाई केली होती. तिने आपला लौकिक राष्ट्रीय स्पर्धेतही कायम राखला.
महाराष्ट्राच्या पदरी आज स्वाती शिंदेच्या एकमात्र ब्रॉंझपदकाची कमाई पडली. स्वाती 50 किलो वजन गटात सुरुवातीलाच पराभूत झाली. मात्र, मिनाक्षीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्याने तिला रेपिचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा उठवत साक्षीने ब्रॉंझपदकाला गवसणी घातली.
स्पर्धेचे निकाल (सुवर्ण, रजत व ब्रॉंझपदक विजेते)
50 किलो – मिनाक्षी (हरियाणा), हेन्नी कुमारी (हरियाणा), स्वाती शिंदे (महाराष्ट्र), कीर्ती (दिल्ली)
55 किलो – अंजू (हरियाणा), बंटी (दिल्ली), इंदू तोमर (उत्तर प्रदेश), सुषमा शोकिन (दिल्ली)
57 किलो – अन्शु (हरियाणा), ललिता (रौप्य), रमण यादव (मध्य प्रदेश), मानसी (हरियाणा)
62 किलो – सोनम मलिक (हरियाणा), साक्षी मलिक (रेल्वे), पुष्पा (मध्य प्रदेश), मनीषा (हरियाणा)
72 किलो – पिंकी (रेल्वे), नैना (हरियाणा), प्रियंका (उत्तर प्रदेश), कविता (रेल्वे).





