Sonam Kapoor Film: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची फिल्म ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ प्रदर्शित होऊन आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने सोनम कपूरने सोशल मीडियावरून चित्रपटाचा हृदयस्पर्शी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा संदेश पुन्हा एकदा समोर आणला आहे. सोनम कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिलं, “कोणत्याही बंधनांशिवाय प्रेमाचं ७ वर्षांचं सेलिब्रेशन एक लड़की को देखा तो ऐसा लगा.” या पोस्टमधून चित्रपटाचा तोच ठळक विचार पुन्हा अधोरेखित झाला. प्रेमाला कोणत्याही लेबलची गरज नसते. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शेली चोप्रा धर यांनी केलं होतं. ही एक रोमँटिक कॉमेडी-ड्रामा फिल्म असून ती लेखक पी. जी. वोडहाउस यांच्या A Damsel in Distress (1919) या कादंबरीवर प्रेरित असल्याचं सांगितलं जातं. चित्रपटात सोनम कपूरसोबत अनिल कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले होते. ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ची कथा चित्रपटाची कथा स्वीटी चौधरी या तरुणीभोवती फिरते. पारंपरिक पंजाबी कुटुंबात वाढलेली स्वीटी स्वतःची खरी ओळख स्वीकारताना अंतर्गत संघर्ष करते. LGBTQ+ समुदायाच्या भावना हा चित्रपट अत्यंत संवेदनशीलता आणि सन्मानाने मांडतो. चित्रपटाचा मुख्य संदेश स्पष्ट आहे प्रेमाला नाव, सीमा किंवा चौकट लागत नाही. या चित्रपटाचं नाव १९९४ मधील ‘1942: A Love Story’ या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावरून घेतलं आहे. हा चित्रपट आणखी एका कारणामुळेही खास ठरला यात अनिल कपूर आणि सोनम कपूर पहिल्यांदाच रिअल लाइफ वडील-लेकीच्या भूमिकेत एकत्र दिसले. तसेच, या चित्रपटातून रेजिना कॅसँद्रा हिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga सोनम कपूर : करिअर आणि वैयक्तिक आयुष्य वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं, तर सोनम कपूर शेवटची ‘ब्लाइंड’ (2023) या चित्रपटात दिसली होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘ब्लॅक’ (2005) या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली आणि ‘सावरिया’ (2007) मधून अभिनयात पदार्पण केलं. ‘नीरजा’, ‘रांझणा’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘वीरे दी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वैयक्तिक आयुष्यात सोनम कपूर लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. पती आनंद आहूजा यांच्यासोबत ती दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत असून, हे जोडपं आधीच मुलगा वायू कपूर आहूजाचे पालक आहे.