मुंबई – छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमात मराठमोळी अप्सरा म्हणजेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ऑफिशल टीजर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला सिनेरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अंगांवर रोमांच उभा करणारा सिनेमाचा टिझर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असलेल्या ताराराणींचे जीवन या सिनेमात अचूकपणे मांडण्यात आले आहे. स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांचा संपूर्ण इतिहास या सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.