लातूर हादरलं.. ! शेती विकण्याच्या वादातून मुलाने आईचा गळा आवळला, मृतदेह शेतात पुरला अन् स्वतःने संपवलं आयुष्य!

लातूर : रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे शेती विकण्याच्या वादातून एका मुलाने आपल्या 70 वर्षीय आईचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह उसाच्या शेतात पुरला. त्यानंतर स्वतःने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण लातूर जिल्हा हादरला आहे.
काय आहे प्रकरण?
48 वर्षीय काकासाहेब वेणुनाथ जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित 8 एकर शेती होती. अलीकडेच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. काकासाहेब यांना चार बहिणी आणि दोन मुली, दोन मुलं असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न केले, ज्यामुळे कर्ज झाले.
हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित शेती विकण्याचा प्रस्ताव आई समिंदराबाई वेणुनाथ जाधव यांच्यासमोर ठेवला. मात्र, समिंदराबाई यांनी पतीच्या निधनानंतर शेती विक्रीला स्पष्ट नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या काकासाहेब यांनी रागाच्या भरात आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून उसाच्या शेतात खड्डा खणून पुरला.
आत्महत्येनंतर उघडकीस आला खून
काकासाहेब यांनी रेणापूर फाट्याजवळ मोकळ्या जागेत बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रेणापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान काकासाहेब यांची आई आणि पत्नी गायब असल्याचे लक्षात आले. शेतात माती उखरलेली दिसल्याने पोलिसांनी खोदकाम केले, तेव्हा पोत्यात बांधलेला समिंदराबाई यांचा मृतदेह आढळला.
या प्रकरणी पोलिसांनी मृत काकासाहेब जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात काकासाहेब यांनी शेती विक्रीच्या वादातून हे क्रूर कृत्य केल्याचे उघड झाले. पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले की, मृतदेह शेतात पुरण्याचा प्रयत्न आणि आत्महत्या यामुळे प्रकरणाची उकल झाली. सध्या पोलिस अधिक तपास करत असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.




