Loni Kalbhor : पाटसच्या गावकारभाऱ्याचा पुत्र अटकेत
Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील गंगा गणेश कुंभार या गंभीर जखमी झाल्या असून, कवडीपाट टोलनाक्याजवळ एका महिला व तिच्या लहान मुलीलाही दुखापत झाली आहे.

लोणी काळभोर : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. ३) सायंकाळी घडलेल्या थरारक प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाटस (ता. दौंड) येथील माजी सरपंचाच्या मुलाने भरधाव वेगाने फॉर्च्युनर वाहन चालवत शेवाळवाडी ते थेऊर फाटादरम्यान समोर येईल त्या वाहनांना धडक देत धुमाकूळ घातला. या बेफाम वाहनचालकाने १० ते १५ हून अधिक वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली. लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत थेऊर फाटा येथे वाहतूक कोंडी करून त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
या प्रकरणात राजवर्धन युगंधर शितोळे (रा. पाटस, ता. दौंड) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार आरती खलसे, महिला पोलीस नाहीद शेख, पोलीस हवालदार विवेक जगताप आणि ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांनी केली. बेफाम वाहनचालकाच्या धडकेत तीन जण गंभीर, तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लोणी काळभोर येथील गंगा गणेश कुंभार या गंभीर जखमी झाल्या असून, कवडीपाट टोलनाक्याजवळ एका महिला व तिच्या लहान मुलीलाही दुखापत झाली आहे.
इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेवाळेवाडी परिसरात फॉर्च्युनर वाहनाने एका पोलिसाच्या वाहनालाही धडक दिली. त्यानंतर हे वाहन पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव निघाल्याची माहिती महिला पोलीस हवालदार आरती खलसे व महिला पोलीस नाहीद शेख यांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने हवालदार विवेक जगताप व ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांच्या मदतीने थेऊर फाटा येथे वाहतूक नियंत्रित करीत वाहनाला अडवण्याची योजना आखली. राजवर्धन शितोळे हा मार्गातील १० ते १५ वाहनांना धडक देत पुढे जात होता. मात्र, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या रणनीतीत तो अडकला. वाहन थांबवल्यानंतरही तो गाडीतून बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर महिला पोलीस हवालदार आरती खलसे आणि महिला पोलीस नाहीद शेख यांनी धाडस दाखवत त्याला वाहनाबाहेर काढले. पोलिसांच्या ताब्यात दिले.
संभाव्य दुर्घटना टळली
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे आणखी मोठी दुर्घटना टळली आहे. वाहनचालक राजवर्धन शितोळे याने मद्य किंवा अन्य कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून, याबाबतचा तपास सुरू आहे. तपासानंतरच यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





