Ashok Saraf : “एकाने माझा पॉकेट मारला. मी रिक्षात बसलो तेव्हा….”; अशोकमामांनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा, दादा कोंडके यांच्याविषयी म्हणाले…
Ashok Saraf : यावेळी अशोक सराफ यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यासपीठावरुन बोलताना भारावून गेले होते.

Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या पटलावर नेण्याचे काम ज्येष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके अशोकमामा अर्थात अशोक सराफ यांनी केले. त्यांच्या एक से बढकर एक मराठी आणि हिंदी चित्रपटांची जादू आजही कायम आहे. त्यांचे मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या याच योगदानाची दखल म्हणून पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अशोक मामा यांनी आता ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. काल त्यांचा नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक सराफ यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर व्यासपीठावरुन बोलताना भारावून गेले होते.
वाचनापेक्षा बघण्यातून आपल्याला अधिक शिकता येतं
यावेळी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांचे पाकिट मारण्यात आले होते. याचा किस्सा त्यांनी यावेळी शेअर केला. अशोक सराफ म्हणाले, “१९७० साली स्लॅपस्टिक कॉमेडी सादर केलेला त्यावेळी पहिला प्रकार. मला अशोक सराफ व्हायचं असे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुधीर जोशीकडे बोलून दाखवले आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांनी साध्य केलं. वाचनापेक्षा बघण्यातून आपल्याला अधिक शिकता येतं असा माझा अनुभव. मी लहानपणापासून नाटकात रांगलो. माझ्या मामाची कलाभूमी होती. माझ्या मामाकडून मी टायमिंग शिकलो. त्याचा मला अधिक फायदा झाला.”
त्यात एकाने माझा पॉकेट मारला. मी रिक्षात बसलो तेव्हा लोक टॉवरवर बसून पाहत होते.
रंगभूमीवर काम करताना मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची एन्ट्री दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातून झाली. या चित्रपटामुळे अशोक सराफ यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटाला अभूतपूर्ण यश मिळाले. याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले “मला मिळालेलं यश तीन तासात मिळालं. पांडू हवालदार चित्रपट पहिला तर लोकांनी मला बाहेर पडू दिलं नाही. गर्दी पाहून ग्राउंड पार करणे मुश्किल. त्यात एकाने माझा पॉकेट मारला. मी रिक्षात बसलो तेव्हा लोक टॉवरवर बसून पाहत होते. तेव्हापासून लोकांना डोक्यावर घेऊन राहायची ही सवय सुरू झाल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. गोंधळात गोंधळ चित्रपटात मी ऍक्शन कॉमेडी समाविष्ट केली. आता तो इतका वाढलाय की सांगता येत नाही, असेही अशोक सराफ म्हणाले.
दादा कोंडकेंची सांगितली आठवण
दादा कोंडके यांची आठवण सांगताना अशोक सराफ म्हणाले “दादा कोंडके इतका उत्स्फूर्त माणूस मी बघितला नाही. जशी परिस्थिती तसे विनोद ते करायचे म्हणून लोकांना ते आवडायचे. मी त्यांच्या सोबत तीन चित्रपट केले. तिन्ही चित्रपट गोल्डन जुबली ठरले. नंतर ते डबल मिनिंगकडे गेले. तो देखील विनोद आहे. लोकांना हसवतो. मात्र लोकांना जास्त वेळ हसवू शकत नाही असे सराफ म्हणाले. “मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं. काय करायचं आणि कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे.” असे मतही यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केले.






