“काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की….”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीवर एकनाथ शिदेंचा शाब्दिक हल्ला

Eknath Shinde : उद्यापासून (८ डिसेंबर) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी जय्यत तयारी विधिमंडळ परिसरात करण्यात आली आहे. मात्र, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमलेले नाहीत, याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे मिळून विरोधपक्षनेता म्हणून जितके संख्याबळ हवे असते तितके नाही. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेतेपदासाठी कायदे दाखवणार असाल तर संविधानात तरतूद नसलेले उपमुख्यमंत्रीपदही तात्काळ रद्द करा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र डागले आहे.
डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर हल्ला चढवला. “तुम्ही म्हणता उपमुख्यमंत्री पद घटना बाह्य आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही घटना बाह्य काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की, मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री त्यांची पोटदुखी थांबतच नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तिला पकडून ठेवली आणि बाकी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
डोंबिवली–कल्याण परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार असून, विकास म्हात्रे यांच्या पॅनलमुळे स्थानिक स्तरावर विकासाच्या कामांना नवी गती मिळेल, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या या भाषणाने कार्यक्रमस्थळी उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. आगामी महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील राजकारण तापणार आहे. विकास म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.
या कार्यक्रमात खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोबिंवली महापालिकेवर महायुतीचा महापौर कसा बसेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुती एकत्र राहिली पाहिजे आणि निवडणुका महायुतीनेच लढल्या पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलताना व्यक्त केले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत आगामी काही दिवसात राजकारण कोणत्या दिशेने जाते आणि कोणत्या घडामोड्या घडतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?





