काही पक्ष “कौटुंबिक चौकटी’पुरते मर्यादित – मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली – देशातील काही राजकीय पक्ष हे केवळ “कौटुंबिक चौकटी’पर्यंत मर्यादित आहेत, अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसवर केली. तसेच
राष्ट्रवादाला वचनबद्धतेने पुढे जाणारे भाजप हा एकमेव “सर्वांगीण कुटुंब’ असलेला पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमधील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. नक्वी म्हणाले, मोदी सरकार सर्व भारतीयांचा सन्मान राखण्यासाठी कटिबद्ध आहे; परंतु काही लोक देशात भय निर्माण करण्याचा कट रचत आहेत. तसेच देशातील सकारात्मक वातावरण आणि विधायक मनोवृत्ती त्यांच्या पचनी पडत नाही.
भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्षच नव्हे, तर प्रादेशिक व धर्मातील अडथळे दूर करून राष्ट्रवादाच्या प्रतिबद्धतेसह सर्वांच्या समृद्धीसाठी काम करणारा पक्ष आहे; परंतु दुसरीकडे काही राजकीय पक्ष एका विशिष्ट कौटुंबिक चौकटीतच मर्यादित आहेत. तर भाजप हा “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या नीतिमूल्ये “एक भारत’ या वचनबद्धतेसह पुढे जात आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने सर्वसमावेशक सशक्तीकरण हे “राष्ट्रीय धोरण” राबविले आहे. अल्पसंख्याकांसह समाजातील प्रत्येक घटक समृद्धी, सन्मान आणि सशक्तीकरणाचा समान भागीदार बनला आहे. तसेच समाजातील सर्व घटक कोणत्याही भेदभावाशिवाय सक्षमीकरणाच्या मार्गावर पुढे जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.





