Prithviraj Chavan : “काही भेटी उघडपणे होतात, तर अनेक भेटी…”; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान चर्चेत
Prithviraj Chavan : पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रत्यक्षात अशी फूट पडेल का, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे.

Prithviraj Chavan : काल शरद पवार गटाच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकादा विविध चर्चांना उधाण आले आहे. ही भेट मतदारसंघातील कामे तसेच विविध ज्वलंत विषयांच्या अनुषंगाने घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच या भेटीवरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा दावा केला आहे.
यावर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “राजकारणात एखादी घटना घडते तेव्हा त्यामागे काहीतरी वेगळा संदर्भ असतो. कोण कोणाला भेटत आहे, कशासाठी भेटत आहे, याबाबत वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मात्र त्या भेटीचा खरा अजेंडा काय आहे, हे त्यांनाच माहिती असते. काही भेटी उघडपणे होतात, तर अनेक भेटी गुप्तपणे होतात आणि त्याची माहिती बाहेर येत नाही. सत्तापक्षातील आमचे जुने मित्र सांगतात की, आम्ही उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, आता राष्ट्रवादी फोडणार.” असा मोठा दावा चव्हाण यांनी केला आहे.
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रत्यक्षात अशी फूट पडेल का, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे. “मी मुख्यमंत्री असताना अशा बऱ्याच गुप्त भेटी व्हायच्या.” असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
नेमकी भेट कशासाठी?
खासदारांची भेट राजकीय कारणांसाठी नसून महाराष्ट्राशी संबंधित विविध ज्वलंत विषयांवर घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत सूत्रांच्या माहितीनुसार, खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील समस्या प्रभावीपणे मांडल्या. तीव्र दुष्काळ परिस्थिती, कांद्याचे पडलेले भाव आणि चंद्रभागा नदीतील वाढते प्रदूषण यांसारख्या गंभीर विषयांचा समावेश होता. दरम्यान, ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या या सातत्यपूर्ण भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.






