पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या बैठकीकडे आपच्या काही आमदारांची पाठ

चंदीगड – आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज बोलावलेल्या बैठकीकडे अमृतसर लोकसभा मतदार संघातील काही आमदारांनी पाठ फिरवली. निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीची समीक्षा करण्यासाठी आणि आमदारांकडून फिडबॅक घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अमृतसर मतदारसंघातील पाच पैकी तीन आमदाराला बैठकीला गैरहजर होते.
लोकसभा निवडणुकीत अमृतसर आणि फतेहगढ साहिब या दोन मतदार संघांत आपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली गेली होती. तथापि, अमृतसर (उत्तर) चे आमदार कुंवर विजय प्रताप सिंह, अमृतसर मध्यचे आमदार डॉ. अजय गुप्ता आणि अमृतसर दक्षिणचे आमदार डॉ. इंद्रबीर सिंह निज्जर अनुपस्थित होते.
सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार डॉ. निज्जर हे कॅनडाला गेले आहेत. तर डॉ. अजय गुप्ता यांनी या विषयावर काही बोलण्यास नकार दिला. कुंवर विजय प्रताप सिंह यांनीही काही बोलणे टाळले.
२०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कुंवर विजय प्रताप सिंह हे आपचे पंजाबमधील पोस्टर बॉय होते. मात्र त्यानंतर त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. अलिकडेच त्यांनी आपल्या पक्षावर गंभीर आरोप केला होता. पक्षात गँगस्टर लोकांना सहभागी करून घेतले जात असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती.
आम आदमी पार्टी आपल्या विचारधारेपासून भरकटत चालली असल्याचेही त्यांचे म्हणणे होते. तर अजय गुप्ता यांनी रविवारी आपली भूमिका मांडताना म्हटले होते की विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनी पक्षाची लोकसभेत पिछेहाट झाली आहे.
यातून एक बाब स्पष्ट होते की पक्षाने आपली विश्वासार्हता गमावली आहे. तर इंद्रबीर सिंह निज्जर पंजाब सरकारमध्ये मंत्री होते. मात्र त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. १६ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा अमृतसर येथे रोड शो झाला होता. त्याचवेळी पक्षातील दुफळी समोर आली होती.





