“दिल्लीत मुजरा करू देत नाहीत म्हणून सोमय्यांचा गल्लीत गोंधळ सुरू आहे”; काँग्रेसची सडकून टीका

मुंबई : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची दिलेली नोटिस आणि किरीट सोमय्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेला शेकडो पोलिसांचा बंदोबस्त यामुळे  अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध विरोधक असा वाद पेटला.  दरम्यान, किरीट सोमय्यांवर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी बोचरी टीका केली आहे. “दिल्लीत मुजरा करू देत नाहीत म्हणून सोमय्यांचा गल्लीत गोंधळ सुरू आहे”. ही नौटंकी मनोरंजक आहे, असा खोचक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, किरीट सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी ते गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा, असा सल्लाही सावंत यांनी किरीट सोमय्या यांना दिला.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला होता. नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे काढत असताना त्यांना कोल्हापूरला येण्यास मनाई करण्यात आली आहे.

तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून परत पाठवू, सर्किट हाऊसमध्ये डिटेन करू, असे सांगितले जात आहे. म्हणजे येथील लोकशाही संपली आहे. जे बोलायचे ते बोलायचे नाही. कशाच्या आधारे तुम्ही त्यांना डिटेन करणार आहात. ही दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.