Solaris Cup National Tennis Tournament : नितीन, अजय, किशोर यांना दुहेरी मुकूट…

पुणे :– सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या सोलारीस करंडक जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या नितीन किर्तने, गुजरातच्या अजय लखोटीया आणि मुंबईच्या किशोर सबनानी यांनी एकेरी आणि दुहेरी गटाचे विजेतेपद संपादन करत स्पर्धेत दुहेरी मुकूट पटकावला. पुण्याच्या नीरज आनंद आणि मुंबईच्या भूषण अकूट यांनी अनुक्रमे ३५ वर्षावरील आणि ५५ वर्षावरील एकेरी गटामध्ये विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेच्या ३५ वर्षावरील गटामध्ये पुण्याच्या नीरज आनंद याने पुण्याच्या मंदार वाकणकर याचा ६-३, ७-६ (५) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. याच गटात दुहेरीमध्ये रविंद्र पांड्ये आणि मंदार वाकणकर या जोडीने जयेश सोळंकी व संदीप पवार या जोडीचा ६-४, ६-७ (११-९), १०-७ असा सुपर टायब्रेकमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.
४५ वर्षावरील गटामध्ये पुण्याच्या नितीन किर्तने याने खेळाडू अमित लाटे याचा ६-०, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुहेरीमध्ये नितीन किर्तने व मुकूंद जोशी या जोडीने अजित सेल व मदन गोखले याचा ६-२, ६-० असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. या गटात नितीन किर्तने याने दुहेरी मुकूट पटकावला.
५५ वर्षावरील गटामध्ये एकेरीत मुंबईच्या भूषण अकूट याने पुण्याच्या अजय कामत याच्यावर विजय मिळवला. दुहेरीमध्ये अजय कामत व जयंत कढे यांनी जयंत पवार व भूषण अकूत या जोडीचा ७-६(४), ६-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवला. ६५ वर्षावरील गटाच्या एकेरीमध्ये गुजरातच्या अजय लखोटीया याने मध्यप्रदेशच्या अब्दुल हनिफ याचा ६-४, ६-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीमध्ये योगेश शहा व अजय लखोटीया यांनी अब्दुल हनिफ व संजय रासकर यांचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या गटात अजय लखोटीया याने दुहेरी मुकूट पटकावला.
PAK vs NZ 1st T20 : टी-20 WC पूर्वी टीम साऊदीने रचला इतिहास, नावावर केला खास रेकॉर्ड…
७० वर्षावरील गटात एकेरीमध्ये मुंबईच्या किशोर सबनानी याने मुंबईच्याच अजित पेंढारकर याचा ६-४, ६-० असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीमध्ये अजित पेंढारकर आणि किशोर सबनानी या जोडीने ए.आर. राव व व्हिएलएसएन राजू या जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. या गटामध्ये किशोर सबनानी याने दुहेरी मुकूट पटकावला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारीचे संचालक जयंत पवार, रावेतकर ग्रुपचे अमित जिनराळकर आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व गटातील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, करंडक, प्रशस्तिपत्रक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी सोलारीस क्लबचे कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आदि उपस्थित होते.



