Solapur News : धक्कादायक.! धावत्या दुचाकीवर हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

Solapur News – दुचाकीवरून जाताना अचानकपणे हृदयविकाराच्या तीव्र झटका आला आणि धावत्या दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यालगतच्या खड्यात पडून एका मंडप व्यावसायिक तरुणाचा सांगोला येथे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना सांगोला महूद रस्त्यावरील चिंचोली तलावाजवळ घडली आहे. नवनाथ बसवेश्वर पलसे (वय- 35, रा. शिवणे, ता. सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुणाचा भाऊ आण्णा बसवेश्वर पलसे यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली असून सांगोला पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पलसे हे सांगोला येथे मेडिकलमधून औषध घेऊन जात होते. स्वतःच्या दुचाकीवरून सांगोल्याकडून- महूद रोडने शिवणे घराकडे तो निघाला होता. चालत्या दुचाकीवर त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे ते दुचाकीसह रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडले.
यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व हातही फॅक्चर झाला होता. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पलसे यांना सांगोला येथील रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचार सुरु केले. मात्र, उपचारदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.





