Solapur News : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला मनिषा मुसळे कारणीभूत; पोलिसांचा दावा

सोलापूर : काही महिन्यांपूर्वी सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर जवळपास 59 दिवसांनी पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळेच्या विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यातून मनीषा मुसळेच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मनीषा हीची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते. तेव्हापासून मनीषाने डॉ. शिरीष यांची बदनामी करण्यास सुरुवात केली होती, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार, अधिकार कमी केल्यावर चिडलेल्या मनीषाने डॉ. शिरीष यांना भेटून आणि फोनवरून सतत बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ईमेल पाठवून मुलांना मारून स्वतः रुग्णालयासमोर जाळून घेत आत्महत्या करण्याची सुद्धा धमकी दिली होती.
याच खोट्या आरोप आणि धमक्यांमुळे व्यथित होऊन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चिठ्ठी लिहीत स्वतःच्या परवानाधारक पिस्टलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. तसेच डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळेने भारतीय न्याय संहिता कलम 108 नुसार गुन्हा केला आहे, असा आरोप पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केला आहे.




