Crime News : मंगळवेढा हादरलं ! विवाहितेवर 3 मित्रांकडून अत्याचार

सोलापूर : मागच्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशीच एक धक्कदायक घटना सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यात घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आरोपींच्या जाचाला कंटाळून तलावात उडी घेवून आत्महत्या केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फिर्यादी तसेच मृत महिलेचा पती कुटुंबासह हे पुणे येथे राहण्यास होते. हे कुटुंब 28 जुलै 2024 रोजी त्यांच्या मूळ गावी आले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे घरी फिर्यादी घरी नसताना ये जा करीत असे.
तो नातेवाईक असल्याने मृत पत्नीच्या पतीला कुठलाही संशय आला नव्हता. पीडित महिला 21 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून घरातून निघून गेली होती.
यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका गृहस्थाने महिलेच्या पतीस फोन करून तुमची पत्नी ही तलावात बुडून मृत्यू झाला आहे असे सांगितले. हे कळताच फिर्यादी हे तात्काळ घटनास्थळी पळत गेल्यावर त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल व चप्पल दिसून आली.लोकांनी मृत महिलेस बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
यानंतर मृत महिलेच्या मोबाईलची हिस्ट्री तपासली असता आरोपी सुरज सुभाष नकाते (वय 29),तोसिफ चाँदसाो मुजावर (वय 24), शुभम मोहन नकाते (वय 24) हे मृत महिलेस अनैतिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत होते.
या आरोपींनी तिच्यावर अत्याचारदेखील केले होते. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारून टाकेन अशी धमकीदेखील या तिन्ही आरोपींनी दिली होती.
यानंतर मृत महिलेच्या पतीने पोलिसांत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर निरीक्षक महेश ढवाण यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता सुरज नकाते याला तीन दिवस,तोसिफ मुजावर यास दोन दिवस व शुभम नकाते याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





