Solapur Ideal Marriage: सध्याच्या काळात लग्न म्हणजे लाखो-कोटींचा खर्च, अवाढव्य झगमगाट आणि बडेजाव असेच समीकरण बनले आहे. मात्र, सोलापुरात या सर्व प्रथांना फाटा देत एक अत्यंत प्रेरणादायी आणि ‘आदर्श विवाह’ पार पडला आहे. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कन्येचा विवाह केवळ १५० रुपयांच्या शासकीय शुल्कात नोंदणीकृत पद्धतीने पार पडला असून, या दांपत्याने समाजसेवेचा एक नवा मार्ग दाखवून दिला आहे. उच्चशिक्षित दांपत्य दत्तात्रय सावंत यांची कन्या सुषमा सावंत आणि शुभम शिंदे यांचा विवाह सोलापूर येथील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. शुभम शिंदे हे पाणीपुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत, तर सुषमा यांनी नुकतेच भारती विद्यापीठ, पुणे येथून मानवी शरीररचना (Human Anatomy) विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. दोन्ही नवविवाहित उच्चशिक्षित असून त्यांनी लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचे ठरवले. २५ लाख रुपयांची मदत शिक्षकांना या विवाहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, शाही सोहळ्यावर होणारा सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च टाळून ती रक्कम विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा स्तुत्य निर्णय या नवविवाहित दांपत्याने घेतला आहे. या निर्णयामुळे ‘सावंत-शिंदे’ परिवारावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. “विचारांची अंमलबजावणी महत्त्वाची” “प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांचे लग्न धुमधडाक्यात व्हावे असे वाटते, त्यासाठी कर्जही काढले जाते. पण मी हा विचार मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या मुलीने आणि जावयाने स्वतःहून हा निर्णय घेतल्याचा मला अभिमान आहे. शिक्षकांसाठी जो संकल्प त्यांनी केला आहे, त्यासाठी मी भविष्यातही काम करत राहीन.” — दत्तात्रय सावंत, माजी शिक्षक आमदार समाजासाठी दिशादर्शक पाऊल या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबांतील केवळ मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. दिखाऊपणाच्या युगात सामाजिक भान जपत केलेला हा विवाह सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सावंत परिवाराने कृतीतून आपला आदर्श समाजासमोर ठेवला आहे. हेही वाचा – Census 2027 Questionnaire: फरशीपासून छतापर्यंत… जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ‘हे’ सर्व प्रश्न विचारले जातील, यादी पहा