Solapur Accident : शेळगीजवळ एसटी-ट्रकची भीषण धडक; चालकासह महिलेचा मृत्यू, १० प्रवासी गंभीर जखमी
या दुर्दैवी अपघातात एसटी बसचे चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, जवळपास दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Solapur Accident : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एसटी बसचे चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, जवळपास दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे जात होती. ही बस सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचल्यानंतर पुन्हा उमरग्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, सोलापूर शहरातून काही अंतरावर असलेल्या शेळगी परिसरात बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला.
या अपघातात एसटी बसचे चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच नागुबाई राम रेवगे या महिला प्रवाशाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून, सुमारे दहा जणांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातामुळे सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





