Satara | सोसायटीने शेतकर्यांचा विश्वास संपादन करावा

मायणी, (प्रतिनिधी) – मायणीच्या यशवंत विकास सेवा सोसायटीचे कामकाज स्थापनेपासून 77 वर्षे अत्यंत छोट्या जागेत सुरू होते. या सोसायटीने चांगले कामकाज करून, नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केला आहे.
जागेच्या अडचणीमुळे नवीन इमारत बांधणे कठीण होते. आता जागा आणि निधी उपलब्ध असल्याने सोसायटीची स्वमालकीची इमारत उभी राहणार आहे. किती नफा मिळतो, यापेक्षा किती जणांचे संसार उभे राहतात, यावर सोसायटीचे यश अवलंबून असते.
शेतकरी व सोसायटी यांचे नाते घट्ट राहण्यासाठी सोसायटीने शेतकर्यांचा विश्वास मिळवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
मायणी, ता. खटाव येथील यशवंत विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि वार्षिक सभेत ते बोलत होते. सोसायटीचे चेअरमन अनिल माळी अध्यक्षस्थानी होते. सरपंच सौ. सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे,
बाजार समितीचे संचालक स्वप्निल घाडगे, सोसायटीचे व्हाइस चेअरमन नाथबाबा सानप, सरपंच प्रतिनिधी रणजित माने, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी शांताराम पवार, हेमंत जाधव, महादेव माळी, महेश थोरात, किशोर माळी, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, अनफळे, पडळ, ढोकळवाडी, कानकात्रे येथील सोसायट्यांचे संचालक उपस्थित होते.
गुदगे म्हणाले, गेल्या 77 वर्षांत अपवाद वगळता सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र, स्वतःच्या संस्था डबघाईस आणलेल्या लोकांनी आमच्या चांगल्या संस्थेस विरोध करून, ती बळकवण्याचा प्रयत्न केला ,
परंतु सभासदांनी जाणीवपूर्वक ही संस्था आमच्या विचारांच्या ताब्यात दिली. कारण संस्था बुडणार नाही, अशी सभासदांची खात्री होती. व्यवसाय वाढवण्यासाठी सोसायटीने जादा कर्जवाटप करावे.
अनिल माळी म्हणाले, गेल्या वेळी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत सर्व संचालकांना निवडून देऊन, सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आहे.
सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज, शेतीविषयक साधने यासाठी प्रयत्न करू. कर्ज वाटप आणि वसुली करून सोसायटी सातत्याने ऑडिट ‘अ’ वर्गात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
सोसायटीचे कामकाज अल्पावधीत संगणकीकृत करण्यात येईल. दादासाहेब कचरे, शांताराम पवार यांची भाषणे झाली.
सोसायटीचे सचिव धनाजी माळी यांनी गतवर्षीचा अहवाल वाचून दाखवला. सर्व सभासदांनी या अहवालास मान्यता दिली. प्रा. इब्राहिम तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. माजी चेअरमन भानुदास बागायतदार यांनी आभार मानले.





