Pune News | अतिआत्मविश्वास नडला ! गणेश मिरवणुकीत पोलीस यंत्रणेला झटका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरात गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, या उत्साहाच्या लाटेत पोलिसांचे नियोजन कोलमडले. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा मंडळे आपल्याला जुमानतील, हा अतिआत्मविश्वास चांगलाच नडल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
नियोजन फक्त कागदावरच…
पोलीस आयुक्तालयातील अती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कागदोपत्री केलेले नियोजन प्रत्यक्षात पूर्णपणे अपयशी ठरले. जुन्या कनिष्ठ अधिकाऱ्यांचा मंडळे वचन देतात एक आणि करतात दुसरे, हा सल्ला दुर्लक्षित करण्यात आला. परिणामतः रस्त्या-रस्त्यावर पोलिसांची अडचण वाढली आणि नवख्या अधिकाऱ्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
बॅरिकेड्सनी वाढवली अडचण..
पोलिसांनी गर्दी रोखण्यासाठी रस्ते बंद करण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. मात्र, त्यामुळे नागरिकांना गर्दीतून बाहेर पडणे किंवा रस्ता ओलांडणे अवघड झाले होते. टिळक रस्ता आणि अलका चौक परिसरात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. इतकेच नव्हे तर चपलांचा अक्षरशः खच पडलेला दिसला.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बेलबाग चौकात संध्याकाळी सहा नंतर वाहतूक आणि गर्दीचे संतुलन पूर्णपणे बिघडले. गणेशोत्सवाची मिरवणूक ही पुण्याची परंपरा असली, तरी कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल, अशा घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष कृतीत ठोस नियोजन आणणे ही काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांचे व्यक्त केल्या.
महिला पोलीस थोडक्यात बचावल्या…
बेलबाग चौकात अरुण मित्र मंडळाने पोलिसांना न जुमानता थेट मिरवणुकीत गोंधळ घातला. पोलिसांनी वारंवार सूचना दिल्या तरीही मंडळाने मिरवणूक दामटली. यावेळी एक महिला पोलीस अधिकारी रथ ओढणाऱ्या ट्रॅक्टरखाली जाता जाता थोडक्यात बचावल्या. याच ठिकाणी एका माजी आमदाराने पोलिसांशी वाद घातल्याचेही दिसले.
पोलीस उपायुक्तांवर टीका…
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे यांच्या हाताबाहेर संपूर्ण नियोजन गेले होते, त्यांनी केलेले संवाद व समन्वय मंडळांनी पूर्णपणे डावलले. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा आणि कायदा-सुव्यवस्थेची शिस्त यांना गालबोट लागले.





