Sanjay Raut : “सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन या झुरळांना पाठिंबा द्यावा”; संजय राऊत
Sanjay Raut : अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि जंतरमंतरवर एकत्र येणाऱ्या तरुणांना आशीर्वाद द्यावेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut : देशाच्या सरन्यायाधीशांच्या तरुणाबाबतच्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल चळवळीची देशभरात चर्चा सुरू असतानाच आता या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला अनेकांकडून पाठिंबा दर्शवला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आवाहन केले आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि जंतरमंतरवर एकत्र येणाऱ्या तरुणांना आशीर्वाद द्यावेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा : Sharad Pawar : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्याने घेतली शरद पवारांची भेट; फोटो आला समोर
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन या झुरळांना पाठिंबा द्यावा. आम्ही स्वागत करू. राळेगणमधून त्यांनी आता दिल्लीत जावं आणि जंतरमंतरवर जे तरूण जमणार आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावेत. कॉकरोच जनता पार्टी हा राजकीय पक्ष नसून एक चळवळ आहे. जसे सोनम वांगचुक यांचा कोणताही पक्ष नाही, तसेच राष्ट्रहितासाठी काही लोक एकत्र येऊन आंदोलन करत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. मात्र, या आंदोलनाला राजकीय रंग देऊ नये आणि गोंधळ निर्माण होता कामा नये.”
संजय राऊत यांनी देशात एकपक्षीय राजकारणाला चालना दिली जात असल्याचा आरोप करत विविध प्रादेशिक पक्षांच्या फुटीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लोक जनशक्ती पक्ष आणि आता तृणमूल काँग्रेसमध्येही अशाच प्रकारचा हस्तक्षेप होत असल्याचा दावा त्यांनी केला.
पश्चिम बंगालमध्येही तसाच पॅटर्न: राऊत
“महाराष्ट्रात पैशाच्या, निवडणूक आयोगाच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या जोरावर शिवसेना फोडण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली गेली. आता पश्चिम बंगालमध्येही तसाच पॅटर्न राबवला जात आहे. हे लोकशाही आणि संविधानासाठी धोकादायक आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
दरम्यान, जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलन आणि त्यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची चर्चा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सगळ्यांचे लक्ष आता ६ जूनला होणाऱ्या आंदोलनाकडे लागले आहे.
हेही वाचा : Anushka Sharma: होमिओपॅथीबाबतचे मत अनुष्काला पडले महागात? सोशल मीडियावर टीकेचा भडिमार






