“लोकांच्या घरात घुसून बायका-पोरांवर…” समीर वानखेडे प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

मुंबई – एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांची रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत सीबीआयसमोर चौकशी झाली. त्यांच्यावर अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाची कार्डेलिया क्रूझ प्रकरणातून सोडवणूक करण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आर्यन खानला अटक करण्यात आली त्यावेळी नवाब मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. याबाबत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे समर्थन करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक जे बोलत होते ते आता खरं होत आहे. शाहरुख हा मोठा अभिनेता आहे. त्याच्या मुलाबाबत असं होत असेल तर सामान्यांच्या मुलांचे काय हाल होत असतील?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
पुढे त्या म्हणाल्या, “समीर वानखेडे यांचा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे. लोकांच्या घरामध्ये घुसून बायका-पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे. त्यामुळे या प्रकरणी सभागृहात आवाज उठवणार आहे.”
दरम्यान, आर्यन खान केसमधील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये कथितरित्या स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द एनसीबीच्या एसआयटीने सादर केलेला अहवाल या सगळ्यांवरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येते आहे.
सीबीआयने वानखेडे आणि इतर चार जणांवर 11 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तक्रारीवरून गुन्हेगारी कट आणि खंडणीची धमकी या गुन्ह्यांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने 22 मे पर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे.





