…म्हणून गलवान खोऱ्यात हिंसाचार घडला; चीनच्या उलट्या बोंबा सुरूच

नवी दिल्ली – सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात चीन व भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट असून भारत व चीन दरम्यानचे संबंध अधिक ताणले आहेत. असं असलं तरी चीनची मुजोरी अद्याप कायम असून आज चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी, ‘गलवान खोऱ्यातील घटना भारतीय सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडल्याने घडली’ अशी गरळ ओकली आहे.
हुआ चुनयिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा आरोप लगावला असून, “सद्य परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावून भारताने चीनच्या आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्त्वाचं रक्षण करण्याच्या क्षमतेला कमी लेखू नये” अशी खुमखुमीही दाखवली आहे.
भारतीय जवानांवर बिनबुडाचे आरोप करताना हुआ चुनयिंग यांनी, “भारतीय जवानांनी चर्चेत झालेल्या सहमतीचं उल्लंघन करत वास्तविकताबा रेषा ओलांडत चिनी लष्कराच्या जवानांवर हल्ला करत चिथावणी दिली. भारतीय जवानांच्या या कृत्यामुळेच जवानांमध्ये झटापट झाली व परिणामी दोन्ही देशांचं नुकसान झालं,” असा दावा केला आहे.
Indian front-line troops broke the consensus and crossed the Line of Actual Control, deliberately provoking and attacking Chinese officers and soldiers, thus triggering fierce physical conflicts and causing casualties.
— Hua Chunying 华春莹 (@SpokespersonCHN) June 18, 2020
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच याबाबत वक्तव्य करताना भारतीय सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. काल अनलॉक-१ च्या पार्श्वभूमीवर विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी, “”भारतीय जवानांनी आपल्या वेळोवेळी आपल्या शौर्याचं दर्शन घडवलंय. आपल्यातील क्षमता सिद्ध केल्या आहेत. विक्रम आणि शौर्य हे आपल्या भारत देशाच्या चारित्र्याचा भाग आहे. मी देशवासियांना विश्वास देतो की, भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपणं आपल्यासाठी सर्वोच्च असल्याने त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. भारताला शांतता हवीये याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. मात्र आम्हाला डिवचल्यास योग्य वेळी भारत प्रतिउत्तर देण्यास सक्षम आहे.” असं वक्तव्य केलं होतं.





