….म्हणून मोर्चाची तारीख बदलली! राज ठाकरेंचा मला फोन आला…; संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Sanjay Raut : राज्यात सरकारने घेतलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोठा विरोध करण्यात येत आहे. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाने या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. त्रिभाषा सूत्राविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जुलै, तर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ७ जुलैला मोर्चा निघणार असल्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली होती.
अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल अशी मोठी घोषणा केली आहे. म्हणजेच ५ जुलैला एकच मोर्चा निघणार असून ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. याबाबतची घोषणा उबाठाचे नेते संजय राऊत यांनी २७ जून रोजी केली आहे.
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची चर्चा होत होती. दोन्हीकडून हालचाली सुरु होत्या. मात्र, स्पष्टपणे बोलण्यास कोणीही तयार नव्हते, अशातच मायमराठीच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू ५ जुलैच्या मोर्चात एकत्र येणार आहेत. याबाबत स्वतः संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. काल २६ जूनला मला राज ठाकरेंचा फोन आला होता. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणे योग्य नाही. एकच मोर्चा निघायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
…म्हणून मोर्चाची तारीख बदलली
राज ठाकरे यांचा फोन आल्याचे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. तर त्यावर उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्य दिसले पाहिजे, असे म्हणाले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 6 तारखेला मनसे पुरस्कृत मोर्चा होता. मी परत राज ठाकरे यांना फोन करून सांगितलं की, आषाढी एकदशी आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी 5 जुलै ही तारीख निश्चित केल्याची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.





