..म्हणून काँग्रेसच्या रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच

नागपूर – महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. मात्र उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढता येणार नाही.
खोटे कागदपत्र लावल्यामुळे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. यानंतर लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आल्याने याविरोधात बर्वे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यावर बुधवारी न्यायालयाने सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकला होता. त्यानंतर गुरुवारी हायकोर्टाने निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र, रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज बाद केल्याप्रकरणी न्यायालयाने कुठल्याही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
याप्रकरणी नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी निश्िचत केली आहे. मात्र, तोपर्यत रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचे मतदान पार पडलेले असेल. त्यामुळे रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला, तरी त्यांची उमेदवारी खारीज केल्याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही.





