..तर मुख्यमंत्र्यांचेही डान्सबारला अभय असं समजू? अनिल परब, ‘सावली डान्सबार’चे पुरावे फडणवीसांकडे सादर

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करत सावली डान्सबार प्रकरणात खळबळ उडवली आहे. कदम यांच्या मातोश्रींच्या नावे कांदिवली येथील सावली डान्सबार असल्याचा दावा परब यांनी विधिमंडळात केला होता.
मंगळवारी (29 जुलै) अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या प्रकरणातील पुरावे सादर केले आहेत. त्यांनी फडणवीस यांच्याकडे कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
अनिल परबांचे आरोप काय?
अनिल परब यांनी विधान परिषदेत सावली डान्सबार हा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचा गंभीर आरोप केला होता. या बारवर 2023 मध्ये 10 ऑगस्ट आणि 28 मे तसेच 2025 मध्ये 31 मे रोजी पोलिसांनी छापे टाकले होते. या कारवाईत 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
परब यांनी दावा केला की, बारमध्ये अश्लीलता आणि नियमांचे उल्लंघन होत आहे, आणि याची जबाबदारी मालकांवर येते. त्यांनी सावली बारच्या परवान्यावर कदम यांच्या मातोश्रींचे नाव असल्याचे कागदपत्रे आणि पोलिसी कारवाईचे पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर केले
याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी हे पुरावे तपासून योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा. जर पुरावे खरे असूनही कारवाई झाली नाही, तर याचा अर्थ फडणवीस डान्सबारांना अभय देत आहेत, असं आम्ही समजू.” त्यांनी पुढे सांगितले की, फडणवीस यांनी पुरावे तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु कारवाईची शक्यता कमी वाटते, असं अनिल परब यांनी म्हटले आहे.
योगेश कदमांचे प्रत्युत्तर
योगेश कदम यांनी परब यांच्या आरोपांचे खंडन करत हे आरोप राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले, “परब यांनी विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून माझ्यावर खोटे आरोप केले. मी माझी बाजू मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडेन. या खोट्या आरोपांनी माझे लक्ष विचलित होणार नाही. गृहराज्यमंत्री म्हणून माझ्याकडील खात्यांचे काम मी प्रामाणिकपणे करत आहे.” कदम यांनी परब यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.





