….म्हणून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव! संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही मोठं योगदान; जाणून घ्या त्यांच्याविषयी…

Who was Di Ba Patil? आज ८ अॅाक्टोबर रोजी बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. खरंतर या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील असे नावे देण्यात यावे, यासाठी मोठा संघर्ष सुरू होता. अखेर सरकारने या नावावर शिक्का मोर्तेब केला आहे. यामुळे आता दि. बा. पाटील हे नक्की कोण होते? याविषयी थोडक्यात समजावून घेऊयात….
दि. बा. पाटील हे भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तीमहत्व म्हणून ओळखले जायचे. त्यांना लोकनेते म्हटले जायचे. दि. बा यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील मोठं योगदान होतं. नवी मुबंई विमानतळाला आघाडीच्या काळात म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना नामातरांवरून मोठं राजकारण झालं. या विमानतळाला शिवसेना प्रमुख हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावे, अशीही मागणी त्यावेळी करण्यात आली होती. पण पुढे पुन्हा महायुतीची सत्ता आली आणि दि. बा. पाटील हेच नाव कायम ठेवण्यात आले.
थोडक्यात परिचय
दिनकर बाळू पाटील असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील जासई येथे झाला. तर मृत्यू २४ जून २०१३ रोजी पनवेल येथे झाला. त्यांनी आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख होते. त्यांची आई आणि वडील हे दोघेही शिक्षक होते. दिबांचं बीएपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. पुढे त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॅालेजमधून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केले.
राजकीय पार्श्वभूमी
ते पहिले पनवेल नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. कुलाबा लोकल बोर्डचे सदस्य होते. पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा दिबांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तर रायगड लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेले होते, अशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी होती.
आंदोलने
दिबांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. अनेक आंदोलने त्यांनी केली. नवी मुंबईत सिडकोविरोधात त्यांनी अनेक आंदोलनं केली. जासईमध्ये भूसंपानासाठी आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी लाठीचार्जही घेतला. मोठ्या संघर्षानंतर राज्य सरकारला नमते घेणे भाग पडले. या आंदोलनानंतर शेकापचे नेते नवी मुंबईकरांसाठी ‘दिबा’ झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही दिबांचं योगदान राहिलेले आहे. त्यांनी ११ महिन्यांचा तुरुंगावस भोगलेला आहे.
सर्वसामान्यांशी नाळ असलेला मोठ्या मनाचा माणूस
दिबांनी शिवसेनेतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. तरीही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. नवी मुंबईतील आगरी समाजातील जनतेसोबत दिबांचे जिव्हाळाचे संबंध होते, तर सर्वसामान्य नागरिकांशीही त्यांची लोकांशी नाळ जोडली गेली होती.
हेही वाचा : “प्रणितला झिरो स्क्रीन टाइम”; अंकिता वालावलकरने सांगितला एडिटिंगचा खेळ…





