…तर दारूची दुकाने बंद होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

जालना – जर मद्य विक्रीची दुकाने आणि मंदिरात गर्दी होत असेल तर ते बंद करावे लागतील, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. जालन्यात पत्रकारांना टोपे म्हणाले, गर्दी झाली तर दारुची दुकानेही बंद करावी लागतील. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होत असेल तर त्याबाबही निर्णय घेऊ. एकाच वेळी जास्त गर्दी करु नये. मंदिरे बंद केलेली नाहीत, पण सामाजिक अंतर पाळले जावे, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढेपर्यंत तसेच हॉस्पिटलमध्ये बेड्स कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत.
18 वर्षांवरील करोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी आयसीएमआरने याबाबतीत सूचना कराव्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे टोपेंनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेने हे निर्बंध सकारात्मकपणे घेऊन पालन करावं, तसंच जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करा असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.





