…. म्हणून मी पंतप्रधान मोदींना ‘तो’ प्रश्न विचारला होता; 2019 मधील मुलाखतीवर अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

मुंबई – बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमार त्याच्या चित्रपट आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. फिटनेस फ्रीक अक्षय कुमार चाहत्यांचे मनोरंजन करतो आणि त्यांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करतो. मात्र, सध्या अक्षय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजेच, 2019 मध्ये अभिनेता अक्षय कुमार याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक विशेष मुलाखत घेतली होती. यावेळी अक्षयने पंतप्रधान मोदींना अनेक प्रश्न विचारले होते आणि पंतप्रधान मोदींनी देखील त्याचे या सर्व प्रश्नांची अगदी दिलखुलास पणे उत्तरे दिल्याचं दिसून आलं होत.
या मुलाखती दरम्यान अभिनेत्यानं देशाच्या पंतप्रधानांना विचारलं होतं की, ‘तुम्हाला आंबे आवडतात का?’, यावर बोलताना मोदी म्हणाले की, “मी आंबा खातो आणि मला आंबे आवडतात. कारण मी लहान होतो तेव्हा आंबे विकत घेऊन खायची आमची परिस्थिती नव्हती. मात्र आम्ही शेतात जायचो आणि तिथं झाडावर लागलेले आंबे खायचो’ असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिल होत.
मात्र, जेव्हा या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला तेव्हा अभिनेत्याला यावरनं खूप ट्रोल केलं गेलं होत. त्यावर अक्षयनं आता जाऊन आपण पंतप्रधानांना हा प्रश्न का? विचारला होता यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अक्षयने याबद्दल खुलासा केला आहे.
अक्षय म्हणाला, ”जेव्हा मी मुलाखत घ्यायला तिथे गेलो, तेव्हा मी एक सर्वसाधारण माणूस होतो. तेव्हा माझ्या डोक्यात जे काही प्रश्न आले ते मी विचारले. “तुम्हाला कोणत्या प्रकारचे आंबे आवडतात?’,’ तुम्हाला जे पैसे मिळतात ते तुम्ही आईला देता का?’ हे असे प्रश्न होते जे कुणी सर्व सामान्य माणूस एखाद्या मोठ्या व्यक्तिला विचारू शकतो”.
”मी विचारच नाही केला की एखादा प्रश्न विचारणं योग्य राहिल की अयोग्य. आणि कोणी मला काही बोललं नाही.. खरं सांगतो. ना पंतप्रधानांनी.. ना पंतप्रधान कार्यालयातून कुणी मला काही बोललं की हे विचारा..ते विचारू नका.. ते एवढंच म्हणाले की,जे प्रश्न तुमच्या मनात येतील ते तुम्ही विचारू शकता…”. असं अक्षय यावेळी म्हणाला.





