पुणे : गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही, तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी माहिती देताना सांगितले की, मान्सूनच्या वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमी दाबाचे क्षेत्र विरले आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील दबावाचाही प्रभाव कमी होणार आहे. कोकणात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असून, त्यानंतर तेथेही पावसाचा जोर ओसरणार आहे. … तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येईल गेल्या आठवड्यात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमिनीत जास्त ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी उत्सुक असले तरी लगेच पेरणी करणे धोकादायक ठरू शकते, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. सध्या जमिनीतील ओलावा आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे बीज रोपणाची प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. मातीच्या गोळ्यांमुळे बियाणं योग्य प्रकारे उगवणार नाहीत, परिणामी दुबार पेरणीचा धोका निर्माण होईल, असं कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे. आज या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी (maharashtra rain update) मागील तीन दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने गुरुवारी उसंत घेतली. मात्र शुक्रवारी (दि. ३०) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके तैनात केली आहेत. मागील २४ तासांत झालेला पाऊस मागील २४ तासांत म्हणजेच गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी, मुंबई शहरात २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, नाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी, रत्नागिरी १०.१, सिंधुदुर्ग १३, पालघर ३.१, नागपूर २० मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, नांदेड, जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. या गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील १७ महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत.मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. (farmers news) २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला. नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला. (Meteorological Department)