मुंबई – बॉलीवूडमधील देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा “द व्हाईट टायगर’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या चित्रपटाला सर्वच स्तरांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशननेदेखील शुक्रवारी हा चित्रपट पाहिला आणि प्रियांका चोप्रा, राजकुमार राव आणि संपूर्ण टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे. हृतिकने आपल्या सोशल मीडियावरून प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांना त्यांच्या शानदार अभिनयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिकने ट्विट केले की, “द व्हाईट टायगर’ हा चित्रपट नुकताच पाहिला.
प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्याकडून शानदार अभिनयाचे प्रदर्शन! माझ्याकडून तुम्हा दोघांनाही सलाम. गौरव आदर्श हा एक उभरता अभिनेता आहे. तसेच नवीन वर्षासाठी ही एक आशादायक सुरवात आहे. चांगले प्रदर्शन केल्याबद्दल रहीम बहरानी आणि टीमचे अभिनंदन! यावर प्रियांकाने देखील हृतिकचे आभार मानले आहेत.
प्रियांकाने लिहिलय की, “थॅंक्यू सो मच दोस्त! तुला चित्रपट आवडला याचं मला खुप समाधान आहे.!’ या सिनेमाच्या निमित्ताने प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा झळकली आहे. हा चित्रपट अरविंद अडिगा यांच्या पुस्तकावर आधारित आहे.