“…म्हणून राज्य सरकार बरखास्त करा” ‘या’ बड्या नेत्याच्या मागणीने खळबळ

मुंबई – “देशातील भाजप विरोधक हे देशबुडवे आहेत, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमधून केला व पुढच्या 72 तासांत महाराष्ट्रातील देशबुडव्यांनी भाजपशी हातमिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली. देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र गेल्याने राज्य सरकार बरखास्त करा,’ अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. शरद पवार यांनी तीच मागणी केली आहे. आम्ही पवारांच्या या भूमिकेशी सहमत आहोत. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला असेल, जो मंत्री भ्रष्टाचारी आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे. संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे पक्ष फोडणे, लोकांना खरेदी करणे, आपल्या पक्षात आणणे आणि स्वच्छ करणे हे सुरू आहे.
राऊत पुढे म्हणाले, देश बुडवे सत्तेत सहभागी झाल्याने पंतप्रधान या देश बुडव्यांवर कारवाई करणार नाही. भाजपचे राज्यातील नेते या देश बुडव्यांची पूजा करत आहेत. हे ढोंग आहे. 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा कुणी काढला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्याचा उल्लेख केला ना. आता देश बुडव्यांच्या हाती अर्थ खाते जाणार असल्याने हे काय झाले याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले पाहिजे. देश बुडवे हे आर्थिक गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला आहे. अन् त्यांच्याच हाती तिजोरी दिली जात आहे.
आता त्यांना शांत झोप लागेल
भाजपचे एक शिलेदार किरीट सोमय्या यांनी कागलच्या हसन मुश्रीफांवर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. “ईडी’ने त्यांच्या अटकेची सर्व तयारी केली. मुश्रीफ हे तात्पुरत्या जामिनावर बाहेर होते. तेही आता अजित पवारांबरोबर भाजपच्या गोटात गेले व मंत्री झाले. छगन भुजबळ यांच्याविरुद्ध मोहीम राबवणारे स्वत: फडणवीस व सोमय्या हेच होते. वळसे-पाटील, धनंजय मुंडेही गेले. भाजपात सामील झाल्यामुळे या सगळयांना आता शांत झोप लागेल. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय हत्यारासारखा सुरू आहे. पाकिटमारांना आत टाकायचे व दरोडेखोरांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करायचे असे एकंदरीत धोरण आहे. कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले!, असेही राऊतांनी पुढे म्हटले.





