Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंना दणका, शिंदेंना फटका; स्नेहल जगताप करणार राष्ट्रवादीत प्रवेश

रायगड : कोकणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच शिंदे गटाचे नेते भरत गोगोवलेंना रोखण्यासाठीही सुनील तटकरेंनी ही मोठी खेळी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नुकतेच स्नेहल जगताप यांचे कुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, कोकणात पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
आज मुंबईत होणार पक्षप्रवेश
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (26 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा अधिकृत पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्नेहल जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत भेट घेऊन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्नेहल जगताप सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत खटके उडत असतानाच सुनील तटकरे यांनी मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. स्नेहल जगताप यांनी सहकुटुंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर आता मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत आज स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान, जगतापांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कितीही एकत्र आले तरी मला फरक पडत नाही, स्नेहल जगताप यांच्या वडिलांपासून आम्हाला सगळं माहिती आहे. स्नेहल जगताप यांचा हा पाचवा पक्षप्रवेश असेल. त्यांच्याकडे आता नितीमत्ता राहिलेली नाही. ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या गोष्टीला चार महिने सुद्धा झाले नाहीत. जगताप कुटुंब जिथे जातं तिथे काय होतं हे अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे, अशी टीका भरत गोगावले यांनी केली आहे.





