पिंपरी | खोट्या सर्पमित्रांमुळे साप धोक्यात

कार्ला, {संजय हुलावळे} – प्रत्येक वेळी साप पकडणारा त्यांचा मित्रच असतो असे नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी, तर कधी तस्करी करण्यासाठी काही खोटे सर्पमित्र जंगलात आढळणारे विषारी साप शहरात मागवतात. त्यांच्यासोबत ‘फोटो सेशन’ करतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. त्यानंतर या सापांना शहराच्या आसपास सोडतात. त्यामुळे असे विषारी साप शहरात दिसत आहेत. काही खोटे सर्पमित्र सापांच्या विषाची तस्करी करण्यातही सहभागी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतलेला, सापांना जीवदान देणारा म्हणजे सर्पमित्र म्हणून ओळखला जातो. मावळ तालुक्यात असे अनेक चांगले सर्पमित्र आहेत; पण शहरात आणि ग्रामीण भागातही काही साप पकडता येणारे आपल्या प्रशिक्षणाचा दुरूपयोग करत आहेत. शहर आणि परिसरात न आढळणारा एखादा साप जंगली भागातून शहरात मागवायचा, त्याच्यासोबत फोटो काढायचे, त्याची माहिती सांगणारे व्हिडिओ करायचे आणि तो शहराच्या आसपास रिकाम्या जागेत सोडून द्यायचा.
हा त्या सापाचा अधिवास नाही. त्यामुळे त्याला लागणारे अन्न मिळत नाही. त्यामुळे भुकेने तो मरून जातो, तर कधी कोणीतरी व्यक्ती घाबरून त्या सापाला मारते. त्यामुळे या खोट्या सर्पमित्रांमुळे साप धोक्यात आल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी खोटे सर्पमित्र शिकारीच्या गुन्ह्यातही सापडले आहेत.
सापाला योग्य पद्धतीने पकडणे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हे सर्पमित्राचे मुख्य काम आहे: मात्र काही जण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सापांची हेळसांड करतात. हे अयोग्य असल्याचे मत सर्पमित्र मांडताना दिसतात.
वर्षभरात शेकडो सापांना जीवदान
मावळ तालुक्यातील चांगले सर्पमित्रांनी वर्षभरात शेकडो सापांना जीवदान दिले आहे. नागरिकांना सापाबाबत माहिती मिळावी तसेच कुठे साप आढळल्यास नागरिकांनी त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क करावा, यासाठी प्रामाणिक आणि चांगल्या सर्पमित्रांचा एक सोशल मीडिया ग्रुप बनवला आहे. त्यांनी साप पकडला की, त्याची माहिती आणि कोठे साप सोडला, याचे व्हिडिओ, ग्रुपवर टाकले जातात. वन विभागाकडून या सर्पमित्रांच्या मीटिंगही घेतल्या जातात.
शहर परिसरात विषारी साप
जंगलातील खडकाळ भागात असणारा सॉसकेल वायपर हा विषारी साप आता शहर परिसरात दिसू लागला आहे. अशाच पद्धतीने तो त्या भागातून येथे आणला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बांबूपिट वायपर हा विषारी सापही मावळ तालुक्यातील शहरात दिसू लागला आहे.
अजगराचा अधिवास शहर व आसपासचा परिसर नाही. मण्यार हा अत्यंत विषारी असणारा साप गवताळ प्रदेश, माळ, किंवा मानवी वस्तीपासून लांब अंतरावर सापडतो; मात्र मानवी वस्ती वाढल्याने त्याचे अधिवास नष्ट झाले. पर्यायाने आता शहराच्या मध्य वस्तीतही मण्यार सापडू लागला आहे.





