Snake Bite Death : साप पकडताना घात झाला! थेऊरमधील २१ वर्षीय धाडसी सर्पमित्राचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत
Snake Bite Death : सर्पदंशानंतर तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले .

Snake Bite Death – हवेली तालुक्यातील थेऊर येथील 21 वर्षीय सर्पमित्राचा साप पकडत असताना सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 25 मे) सायंकाळी कोलवडी ग्रामपंचायत हद्दीत घडली. या घटनेत दिपक संतोष जाधव (वय 21, रा. सिद्धेश्वर मंदिर रोड, काळे वस्ती, थेऊर, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला आहे.
दिपक जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील विषारी व बिनविषारी साप विनामोबदला पकडण्याचे काम करत होते. ते एक सक्रिय गोरक्षक आणि सर्पमित्र म्हणून परिसरात परिचित होते. नागरिकांच्या घरात किंवा शेतात साप निघाल्यास दिपक यांना फोन केला जात असे. ते कोणतीही भीती न बाळगता तातडीने घटनास्थळी जाऊन सापांना सुरक्षित पकडून निसर्गात सोडत असत.
सोमवारी सायंकाळी कोलवडी परिसरात साप निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर दिपक हे नेहमीप्रमाणे तेथे पोहोचले. शोधमोहीम सुरू असताना एका ठिकाणी पडलेल्या पत्र्यांच्या ढिगार्याखाली साप लपल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी पत्र्याखाली हात घातला असता दबा धरून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच नागरिक व मित्रांनी त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.





