Smriti Mandhana Record : एका चुकीने केला घात! वादळी सुरुवातीनंतर स्मृती मानधना रनआऊट; तरी केला ‘हा’ खास पराक्रम
Smriti Mandhana Record : या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना थायलंडसमोर १६० धावांचे लक्ष ठेवले आहे.

Smriti Mandhana Run Out Lazy Running IND vs THA Womens Asia Cup 2026 : एसीसी महिला आशिया कप २०२६ (ACC Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली. थायलंडविरुद्धच्या पहिल्या ग्रुप-ए सामन्यात ७ वेळच्या चॅम्पियन टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अवघ्या २.५ षटकांत बिनबाद ३८ धावा कुटल्या. मात्र, डावाच्या तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) एक निष्काळजी धाव महागात पडली आणि तिला धावचीत (Run Out) होऊन तंबूत परतावे लागले.
१९० च्या स्ट्राईक रेटने हल्लाबोल; पण ‘जॉगिंग’च्या नादात गमावली विकेट –
क्रीझवर येताच स्मृती मानधनाने थायलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या १० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने १९ धावा ठोकल्या होत्या. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफाली वर्माने वाईड मिड-ऑनच्या दिशेने फटका मारला. पहिली धाव वेगाने पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावताना स्मृती मानधना अतिशय संथ (Jogging style) धावली. दरम्यान, लाँग-ऑनवरून धावून येत थाई क्षेत्ररक्षक अफिसरा सुवानचोनराथीने नॉन-स्ट्रायकर एंडवर थेट अचूक थ्रो मारला. बेल्स उडाल्या तेव्हा स्मृती क्रीझच्या बरीच बाहेर होती; तिने तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट न पाहताच मैदानाबाहेर जाणे पसंत केले.
View this post on Instagram
न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला टाकले मागे; बनली जगातील नंबर-२ फलंदाज –
Tough luck for the vice-captain💔🔥
Smriti Mandhana falls for a quickfire 19 off 10 balls after a deflection at the bowler’s end results in an unlucky run-out vs Thailand🏏 pic.twitter.com/LRsQTz1UwC
— CricInformer (@CricInformer) August 30, 2026
जरी स्मृती मानधना विचित्रपणे धावचीत झाली असली, तरी बाद होण्यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला. स्मृतीने न्यूझीलंडची दिग्गज खेळाडू सुझी बेट्सचा (१०,७४० धावा) विक्रम मोडीत काढला आणि ती आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी जगातील दुसरी फलंदाज बनली. स्मृतीच्या नावावर आता तिन्ही प्रकारांत मिळून तब्बल १०,७५६ धावा जमा झाल्या आहेत.
मिताली राजच्या जागतिक विक्रमापासून अवघ्या ११३ धावा दूर –
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम भारताची माजी कर्णधार मिताली राज (१०,८६८ धावा) हिच्या नावावर आहे. आता या ऐतिहासिक शिखरापासून स्मृती मानधना अवघ्या ११३ धावा दूर आहे. चालू आशिया कप स्पर्धेदरम्यानच स्मृती मिताली राजचा हा महान विक्रम मोडीत काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची नवी महाराणी बनेल, असा ठाम विश्वास क्रीडा विश्वातून व्यक्त केला जात आहे.





