IND W vs AUS W : स्मृती मंधानाचा ऐतिहासिक पराक्रम; महिला वनडेत ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिलीच खेळाडू

Smriti Mandhana Set New Record : आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामना विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरताना स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने मैदानावर पाऊल ठेवताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यंदाच्या विश्वचषकात स्मृतीची बॅट भलेही शांत राहिला असला, तरी ती सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यातही तिने असाच एक पराक्रम केला.
महिला वनडेत एका वर्षात हजार धावा करणारी पहिली खेळाडू –
स्मृती मंधानाने 2025 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात तिने आपल्या खेळीत 12 धावा पूर्ण करताच या वर्षी वनडेत 1000 धावांचा टप्पा गाठला. यासह स्मृती मंधाना ही महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात हजार धावा करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात तिने एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा महिला वनडे क्रिकेटमधील विक्रम आपल्या नावावर केला होता.
𝗔 𝗺𝗼𝗻𝘂𝗺𝗲𝗻𝘁𝗮𝗹 𝗳𝗲𝗮𝘁 🙌
Smriti Mandhana now becomes the first batter to cross 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs in ODIs (in Women’s Cricket) in a calendar year 👏
Updates ▶ https://t.co/VP5FlL2S6Y#TeamIndia | #WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS | @mandhana_smriti pic.twitter.com/eNq0uYasiT
— BCCI Women (@BCCIWomen) October 12, 2025
केवळ 18 डावांत स्मृतीची ऐतिहासिक कामगिरी –
महिला वनडेत एका वर्षात हजार धावा पूर्ण करणारी पहिली खेळाडू बनलेल्या स्मृती मंधानाने ही कामगिरी अवघ्या 18 डावांत साध्य केली. या कालावधीत तिची सरासरी 59.64 इतकी प्रभावी राहिली आहे. स्मृतीच्या बॅटमधून 4 शतके आणि 3 अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकातील या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. यापूर्वी खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
हेही वाचा – IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध कुलदीपचा दबदबा! पाचव्यांदा ‘हा’ पराक्रम करत वॉर्डलच्या विक्रमाशी केली बरोबरी
भारतीय संघाची दमदार सुरुवात –
स्मृती मंधानाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तिच्या या विक्रमामुळे भारताच्या विश्वचषकातील आशा आणखी बळावल्या असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात तिने संघाला मजबूत सुरुवात करुन दिली आहे. त्यामुळे तिच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा आहे. भारतीय संघाने 22 षटकानंतर बिनबाद 128 धावा केल्या असून मंधाना 63 आणि रावल 57 धावांवर नाबाद आहेत.





