Smriti Shafali Record : स्मृती-शफाली जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताच मोडला न्यूझीलंडच्या जोडीचा विक्रम
Smriti Shafali Record : स्मृती मानधना आणि शफाली वर्मा ही जोडी आता महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिली जोडी

Smriti Mandhana Shafali Verma Partnership Record : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १७० धावांचा डोंगराएवढा स्कोअर उभारला. भारताला या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात स्टार सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या जोडीने मोलाची भूमिका बजावली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर भारतीय सलामीच्या जोडीने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
न्यूझीलंडच्या सुझी बेट्स अन् सोफी डिव्हाईनचा मोडला रेकॉर्ड –
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा ही जोडी आता महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिली जोडी बनली आहे. या बाबतीत त्यांनी न्यूझीलंडच्या सुझी बेट्स आणि सोफी डिव्हाईन यांच्या जोडीला मागे टाकले आहे. स्मृती आणि शफाली यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत २४ डावांमध्ये एकत्र फलंदाजी करताना ३२.१६ च्या सरासरीने एकूण ७७२ धावा कुटल्या आहेत. यामध्ये एक शतकीय आणि चार अर्धशतकीय भागीदाऱ्यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या सुझी बेट्स आणि सोफी डिव्हाईन या जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकत्र फलंदाजी करताना ७३२ धावा केल्या होत्या, जो आता दुसऱ्या क्रमांकावरील रेकॉर्ड ठरला आहे.
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या:
Steady start 👌
Smriti Mandhana 🤝 Shafali Verma #TeamIndia 43/0 after the powerplay.
Updates ▶️ https://t.co/WlUV2rjwTj #T20WorldCup | #WomenInBlue | #AUSvIND pic.twitter.com/cdSXcx3H2n
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2026
- स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (भारत): ७७२ धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
- सुझी बेट्स आणि सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड): ७३२ धावा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
- स्मृती मानधना आणि शफाली वर्मा (भारत): ६५५ धावा (विरुद्ध इंग्लंड)
अर्धशतक हुकले, पण पाया मजबूत केला –
या ऐतिहासिक सामन्यात मानधना आणि शफाली या दोन्ही खेळाडूंना वैयक्तिक अर्धशतक झळकावता आले नाही, तरीही त्यांनी संघाला भक्कम सुरुवात करून दिली. शफाली वर्माने २६ चेंडूंत ३४ धावांची आक्रमक खेळी केली, तर उपकर्णधार स्मृती मानधनाने ३७ चेंडूंत ३८ धावांचे योगदान दिले. या मजबूत पायामुळेच भारताला ऑस्ट्रेलियासमोर १७० धावांचे कठीण लक्ष्य ठेवता आले.





