Black Day : धूर, किंकाळ्या आणि मृत्यूचा सापळा; 28 वर्षांपूर्वी घडली होती हृदयद्रावक घटना
Black Day : मात्र, दिल्लीतील एका चित्रपटगृहात घडलेल्या भीषण दुर्घटनेने आनंदाचे वातावरण क्षणात शोकांतिकेत बदलले.

Black Day : 13 जून 1997 हा दिवस हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक दिवस ठरला, कारण या दिवशी रिलीज झालेल्या एका बॅालिवूड चित्रपटाने इतिहास रचला. पण त्याचवेळी देशाच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायी आणि काळाकुट्ट दिवस म्हणूनही हा दिवस नोंदवला गेला. आज 13 जून असल्याने 28 वर्षांपूर्वी घडलेल्या वेदनादायी घटनेची आठवणी ताज्या झाल्या आहेत.
याच दिवशी दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा देशभक्तीपर युद्धपट ‘बॉर्डर’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुंबळ गर्दी झाली होती. मात्र, दिल्लीतील एका चित्रपटगृहात घडलेल्या भीषण दुर्घटनेने आनंदाचे वातावरण क्षणात शोकांतिकेत बदलले.
नेमकं काय घडलं होतं? (Black Day)
दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरातील उपहार सिनेमा येथे दुपारच्या शोदरम्यान ‘बॉर्डर’ चित्रपट सुरू असतानाच थिएटरच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन आग लागली. काही क्षणांतच धूर संपूर्ण इमारतीत पसरला आणि थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रेक्षकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक आपत्कालीन मार्ग बंद असल्याने शेकडो लोक आतच अडकले. या भीषण दुर्घटनेत तब्बल 59 जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 100 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि संपूर्ण कुटुंबांचाही समावेश होता. त्यामुळे हा प्रसंग देशातील सर्वात मोठ्या चित्रपटगृह दुर्घटनांपैकी एक ठरला.
तपासादरम्यान अग्निसुरक्षेच्या नियमांकडे झालेली गंभीर दुर्लक्ष, बंद आपत्कालीन मार्ग आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यांसारख्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यामुळे ही दुर्घटना केवळ अपघात नसून निष्काळजीपणाचा परिणाम असल्याची भावना देशभरातून व्यक्त झाली.
उपहार अग्नितांडवानंतर देशभरातील चित्रपटगृहांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी, आपत्कालीन मार्गांची उपलब्धता आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर नियम लागू करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर तसे नियम देखील लागू करण्यात आले. पण दुर्घटना घडण्याअगोदर काळजी घेतली असती तर कदाचित त्या 59 जणांचे प्राण वाचले असते.
बॅाक्स अॅाफिस गाजवलं, पण… (Black Day)
दरम्यान, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लढाईवर आधारित ‘बॉर्डर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. सुमारे 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास 66.70 कोटी रुपयांची कमाई करत त्या काळातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. मात्र, ‘बॉर्डर’च्या प्रदर्शनाचा दिवस अनेकांसाठी यशाचा नव्हे, तर आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखाचा दिवस ठरला.
हेही वाचा : Moringa Rice: साधा भात खाऊन कंटाळलात? मग एकदा नक्की ट्राय करा हेल्दी मोरिंगा राईस






