Pune District : फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांसह श्वसनाचे विकार वाढले

मंचर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणात प्रदूषणाची पातळी वाढल्याने डोळ्यांची जळजळ,अश्रू येणे, घशात खवखव,श्वास घेण्यास त्रास होणे, विविध अशा तक्रारी वाढल्या आहेत.
विशेषतः लहान मुले,ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचे रुग्ण यांना त्रास अधिक होत आहे. शहरातील काही रुग्णालयांमध्ये या लक्षणांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत. नागरिकांनी घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा, डोळ्यांत जळजळ झाल्यास थंड पाण्याने धुवावेत आणि जास्त धुराच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे मंचर येथील डॉ. सोनाली विकास बाणखेले यांनी सुचविले आहे. दिवाळी सणात फटाक्यांचा आनंद घेतानाच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी केले.
दिवाळीतील फटाक्यांचा धूर डोळे व श्वसनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम करतो.दम्याचे किंवा अॅलर्जी असणाऱ्यांनी फटाक्यांपासून दूर रहावे व गरज भासल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
– डॉ.सचिन गाडे,नेत्ररोगतज्ञ मंचर.
मुलांना फटाके उडवायचा उत्साह असतो, पण धुरामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे यावर्षी आम्ही कमी फटाके घेतले व पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा निर्णय घेतला.
-सुषमा शिंदे,गृहिणी, मंचर.





