सातारा – सातारा पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीने दोन दिवस धुराच्या लोटाने शहराचे आसमंत काळवंडले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाने कशीबशी आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेने आरोग्य यंत्रणेचा बेफिकिरपणा चव्हाट्यावर आला आहे. आगीमुळे होणारे प्रदूषण लात घेऊन सातारा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे लिंबाजी भड यांनी सातारा पालिकेला नोटीस बजावली. मात्र, ही नोटीस अद्याप प्राप्त झालेली नाही, असे आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांनी सांगितले.
सातारा पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. शहरापासून काही अंतरावर असलेल्या सोनगाव परिसरातील डेपोत कचरा टाकला जातो. किल्ले अजिंक्यताराच्या पिछाडीस हा कचरा डेपो आहे. दोन दिवस झाले या कचरा डेपोत आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट 24 तास पसरत आहेत. परिवहन विभागाला धावपळ करूनही दोन दिवस अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझवावी लागली. ही आग मुद्दाम लावण्यात आल्याची चर्चा आहे.
रोजचा 45 टन कचरा सोनगाव डेपोत टाकला जातो. पावणेसात एकर क्षेत्र असणाऱ्या या जागेची क्षमता संपली असून डेपोत लागणारे कचऱ्याचे ढीग जाणीवपूर्वक पेटविले जात असल्याची चर्चा आहे. या परिसराकडे कोणत्याच यंत्रणेचे लक्ष नसल्याने प्रदूषण होत आहे. तसेच दुर्गंधीयुक्त वास पसरल्याचे सकाळी व्यायामाचे निमित्ताने फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
सोनगाव, डबेवाडी आणि किल्ले अजिंक्यतारा परिसरात धुराचे लोट येत असल्याने नागरिकांना धावण्याचा व्यायाम करताना श्वास घेताना अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घडामोडींची दखल घेऊन सातारा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे लिंबाजी भड यांनी सातारा पालिकेला नोटीस बजावली. मात्र, ही नोटीस अद्याप प्राप्त झालेली नाही असे आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांनी सांगितले. सोनगाव कचरा डेपोकडे कोणाचे लक्ष नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.