नवी दिल्ली : भारतातील दर्जेदार स्मार्टफोनचे उत्पादन वेगाने वाढत आहे. अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रथमच कॅलेंडर वर्षाच्या दुसर्या तिमाहीत म्हणजे एप्रिल- जून या कालावधीत भारताने अमेरिकेला पाठविलेल्या स्मार्टफोनची संख्या चीनने अमेरिकेला पाठविलेल्या स्मार्टफोनच्या संख्येपेक्षा जास्त भरली आहे. भारत सरकारने मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उत्पादन वाढावे यासाठी विविध क्षेत्रासाठी उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ स्मार्टफोन उत्पादकही घेत आहेत. यामुळे केवळ भारतीय नागरिकांसाठी स्मार्टफोनचे उत्पादन वाढत नाही तर निर्यातही वाढू लागली आहे. चीन हा स्मार्टफोन उत्पादन क्षेत्रातील जगातील सर्वात बलाढ्य देश समजला जातो. मात्र आता अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करण्याच्या क्षेत्रात भारताने चीनला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे बर्याच चिनी कंपन्या भारतात उत्पादन प्रकल्प राबवीत आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत अमेरिका आणि चीनचे व्यापारी मतभेद मोठ्या प्रमाणात वाढले होते. परस्परावर आयात शुल्क वाढविण्याची स्पर्धा लागली होती. या परिस्थितीचाही भारतातील स्मार्टफोन निर्यातदारांना फायदा झाला असल्याचे दिसून येते. हा वेग कायम ठेवण्याची जबाबदारी आता भारतातील निर्यातदारासमोर आहे. शुल्क वाढीच्या परस्पर विरोधी घोषणामुळे अमेरिकेत या कालावधीत स्मार्टफोनची आयात एक टक्क्याने वाढली. कॅनालीस या संस्थेने ही आकडेवारी संकलित केली आहे. या तिमाहीत अमेरिका- चीन मतभेद वाढले. यामुळे चीनमधील उत्पादनावर परिणाम झाला. या तिमाहीत चीनमधील स्मार्टफोनची अमेरिकेला निर्यात कमी होऊन 25 टक्क्यावर आली. गेल्या वर्षी या कालावधीत ही निर्यात 61% इतकी होती.या परिस्थितीचा फायदा भारतातील उत्पादकांनी घेतला आणि ही तूट भारतीय उत्पादनांनी भरून काढली. या तिमाहीत भारतीय स्मार्टफोनची अमेरिकेला होणारी निर्यात 240 टक्क्यांनी वाढली आणि आता अमेरिका करत असलेल्या एकूण आयातीत भारताचा वाटा 44 टक्क्यावर गेला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण केवळ 13 टक्के होते. अमेरिकेसह विविध देशानी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतासारख्या पर्यायी उत्पादन केंद्राचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्या भारतात उत्पादन वाढवीत आहेत, असे कॅनालीस संस्थेचे विश्लेषक सान्याम चौरसिया यांनी सांगितले. आयफोनचे उत्पादन जास्त दुसर्या तिमाहीत आयफोनची अमेरिकेला निर्यात 13.3 दशलक्ष युनिटची झाली. सॅमसंगची निर्यात 38 टक्क्याने वाढून 8.3 दशलक्ष युनिट झाली. मोटारोला कंपनीची निर्यात दोन टक्क्यांनी वाढून 3.2 दशलक्ष युनिट झाली. गुगल, टीसीएल या कंपन्यांची अमेरिकेला निर्यात वाढली आहे.