Smart Meter: महावितरणचा थेट मोबाईलवर मेसेज; ४८ तासांच्या ‘या’ अल्टिमेटममुळे शहरात संतापाचा भडका
Smart Meter: महावितरणकडून पुणेकरांच्या मोबाईलवर थेट १७ ऑगस्ट २०२१ च्या राजपत्राचा दाखला देत ४८ तासांत मीटर बदलण्याचा इशारावजा मेसेज.

Smart Meter – ग्राहकांची कोणतीही तक्रार नसताना, व्यवस्थीत चालू असलेले चालू वीज मीटर बदलून त्यांच्या माथी सक्तीने ‘स्मार्ट मीटर’ मारण्याचा सपाटा महावितरणने लावल्यामुळे पुणेकरांमध्ये संतापाचा तीव्र उद्रेक झाला आहे. मीटर व्यवस्थित चालले असताना ते बदलण्याची सक्ती महावितरण का करत आहे? असा सवाल सामान्य ग्राहक विचारत आहेत. महावितरणने सध्या ग्राहकांच्या मोबाईलवर थेट १७ ऑगस्ट २०२१ च्या राजपत्र अधिसूचनेचा दाखला देत संदेश पाठवले आहेत.
हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर तुमचे चालू मीटर बदलून तेथे स्मार्ट मीटर बसवले जाईल, असा इशारावजा धाक संदेशातून दिला आहे. शासनाचा आणि नियमांचा बागुलबुवा उभा करून ग्राहकांवर ही यंत्रणा जबरदस्तीने लादली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. अचूक बिलिंग, मोबाईल ॲप आणि सौरऊर्जेच्या वेळेत मिळणाऱ्या सवलतींची आमिषे दाखवली जात असली, तरी महावितरणच्या या डिजिटल पारदर्शकतेवर ग्राहकांचा कितपत विश्वास आहे, याविषयी साशंकता आहे.
सक्तीवर आक्षेप
मीटर बदलण्याची प्रक्रिया मोफत आहे असा दावा महावितरण करत असले, तरी भविष्यात मीटरच्या नावाखाली प्रीपेड पद्धत आणून ग्राहकांची कोंडी केली जाईल, अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. कोणतीही तांत्रिक अडचण किंवा वीज चोरीची तक्रार नसताना, सरसकट सर्वच घरांचे मीटर बदलण्याचा हा घाट कोणाच्या फायद्यासाठी घातला जात आहे? असा प्रश्न ग्राहक संघटनांनी उपस्थित केला आहे.
आधीच वाढीव वीजबिलांमुळे त्रस्त असलेल्या जनतेला विश्वासात न घेता, केवळ ४८ तासांची मुदत देऊन घरपोच मीटर बदलण्याची ही दडपशाही थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. महावितरणने आपली ही सक्ती मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
महावितरणचा स्मार्ट दावा
महावितरणतर्फे राज्यात १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविले असून, यामुळे ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारीत मोठी घट झाल्याचा दावा केला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडिंग होत असून ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे दर तासाला वीज वापर पाहता येतो. यामुळे बिलात पारदर्शकता आली असून ग्राहकांना वीजवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.
या ॲपमुळे घरातील अर्थिंग समस्या किंवा वीजगळतीची त्वरित माहिती मिळते. विशेष म्हणजे, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठी प्रति युनिट ८५ पैसे सवलत मिळते. याशिवाय डिजिटल पेमेंट आणि गो ग्रीन अंतर्गत दरमहा अतिरिक्त सूट मिळून ग्राहकांचा दुहेरी फायदा होतो अशी मखलाशी महावितरण करत आहे.






